कालची थंडी कुठे जोरात होती
वाढली थरथर कशी ओठात होती
एवढी अडचण पुढे जाण्यास होती
जात धर्माची दरी दोघात होती
टांगता आली न भिंतीवर घराच्या
एक प्रतिमा काळजाच्या आत होती
एवढे कळले तुझ्या शहरात येउन
माणसे साधीसुधी गावात होती
घेतली दिवटी तिने हातात आता
आजवर ती फक्त अंधारात होती
फुंकले होते हवेने कान अमुचे
त्यामुळे भीती मनाला खात होती
- सतिशसिंह मालवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!