पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना_मराठी गझल सतीश मालवे_गुलाबीगझल_satish Malve
-
"वेदना"
पिकल्यात काळजाच्या शेतात वेदना
वाटू कशा तुम्हाला फुकटात वेदना
दिसतो वरून अवघा मी कोरडा जरी
आतून ओल मजला देतात वेदना
बहुतेक घाव झाले असतील देखणे
लाजून फार माझ्या गेल्यात वेदना
विश्वास तोडल्यावर देऊ नका फुले
काट्यासमान हृदयी सलतात वेदना
पाहून पुस्तकांवर ही धूळ कालची
बहुतेक दप्तराला झाल्यात वेदना
- सतिशमालवे(मुऱ्हादेवी)