गझलेतील शब्दकळा|सतीश गुलाबसिंह मालवे| साहित्य भरारी साप्ताहिक मधे प्रकाशित लेख
गझलेतील शब्दकळा : एक शब्दानुभव
— सतिश गुलाबसिंह मालवे
काही दिवसांपूर्वी गझलेतील शब्दांच्या वापराबाबत आदरणीय अनंत ढवळे सरांशी एक अर्थपूर्ण संवाद झाला. त्या संवादाने मनात विचारांची एक नवी खिडकी उघडली. गझलेत शब्दांचा वापर कसा असावा, तो किती सर्जनशील, अर्थवाही आणि संवादी असावा, हे समजून घेण्याच्या दिशेने त्यांनी मला अतिशय बारकाईने मार्गदर्शन केले आणि यावर लिहिण्याचा आग्रहही केला. त्यांच्या त्या विश्वासामुळेच थोडं धाडस करत आहे. हा लेख म्हणजे त्यांच्या विश्वासाला अर्पण केलेली एक नम्र अभिव्यक्ती आणि माझ्या शब्दप्रेमाची साठवण आहे.
गझल ही केवळ शेरांची रचना नसते; ती एक संवेगाची अनुभूती असते. आणि त्या अनुभूतीला योग्य रूप देणारी शक्ती म्हणजे शब्दकळा. शब्द केवळ अर्थ पोहोचवत नाहीत, ते भावना उलगडतात, अनुभव फुलवतात आणि कधी काळजासारखं आत खोलवर पिळवटून टाकतात. म्हणूनच, गझलेतील शब्दांची निवड ही फक्त भाषिक कृती नसते तर एक सर्जनशील प्रक्रिया असते. ही प्रक्रिया म्हणजे आत्म्याच्या गुंजनाला शब्दरूप देण्याची एक प्रक्रिया असते.
आजची गझल प्रेम, विरह, तत्त्वज्ञान, सामाजिक परिवर्तन, ग्रामीण जीवन, शेतकरीजीवन, अस्तित्व, एकाकीपणा आणि अगदी तंत्रज्ञान अशा विविध विषयांपर्यंत पोहोचते. काळाच्या गरजेनुसार ती स्वतःला बदलते. पण या सर्व प्रवासात गझलची खरी ओळख जपून ठेवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दकळा!
गझलेतील शब्द हे केवळ अलंकार नसतात तर गझलेचे आत्मस्वरूप असतात. शब्दांचे निवेदन, त्यांचा नाद, त्यांची उंच-सखल लय यामधूनच गझलेतील ‘गझलियत’ जिवंत राहते. योग्य शब्दांची निवड म्हणजे भावनेला दिलेली शुद्ध, सूक्ष्म आणि सौंदर्यपूर्ण वाट असते. अशा शब्दांनी नटलेली गझल केवळ वाचली जात नाही, तर अनुभवली जाते, अंतर्मनात रुंजी घालते आणि अनेकदा वाचकाच्या मौनालाही व्यक्त करत जाते.
मी गझलेतून जे काही शिकत आलो, वाचत गेलो आणि अनुभवत असतो, ते येथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे लेखन पूर्ण झालेले नाही, कारण शब्दकळेचा प्रवास कधीच पूर्ण होत नाही. तो दरवेळी नव्याने उमटतो एखाद्या शेरात, एखाद्या मर्मभेदक शब्दात… आणि पुन्हा-पुन्हा आठवण करून देतो की, गझल का लिहावी वाटते, का वाचावी वाटते.
गझलेतील शेरात शब्दांची निवड अशी असावी की ते ऐकता क्षणी मधुर, अर्थपूर्ण आणि मनात ठसणारे वाटावेत. जसे आपण प्रत्येक शेरात आशयानुसार वेगळा काफिया निवडतो, तसा प्रत्येक काफिया रदीफसोबत एक नादसौंदर्य निर्माण करतो. हे नादसौंदर्य गझलेला विशिष्ट लय आणि संगीतमयता प्रदान करत असते.
याचबरोबर गझलेत वापरलेली प्रतीकं आणि अलंकारही तितकेच महत्त्वाचे असतात. काही शेर थेट भिडतात, तर काही शेर सूक्ष्म प्रतिमांमधून बोलतात. त्यामुळे शब्दांत भावनिक खोली असणे अत्यावश्यक ठरते. गझलेतील शब्द जितके साधे, तितकेच गहिरे असतात. एकाच शब्दाला विविध संदर्भांत निरनिराळे अर्थ असतात.
उदाहरणार्थ, “दुःख” हा शब्द प्रेमातील वेदना, एकटेपणा, दुसऱ्याकडून झालेली भावनिक जखम, अथवा मूक वेदना अशा अनेक रूपांत प्रकट होतो. यालाच आपण ‘भावनिक गहराई’ म्हणतो.
आदरणीय अनंत ढवळे सरांचा एक शेर पाहुयात
"कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दुःखाची गाज दूरवर घुमत राहिली
हा शेर एकटेपण आणि दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. "मूक अरण्यातील पानगळ" आणि "दुःखाची गाज" ही शब्दकळा शेरात एक विशेष भावनिक खोली निर्माण करते. ती एकाकीपणा आणि आंतरिक वेदनेची प्रतीकं बनतात. त्यामुळे वाचक त्यात गुंतून पडतो.
त्याच गझलेतील आणखी एक शेर
"कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली"
हा शेर जीवनाच्या गूढतेवर अत्यंत सूक्ष्म भाष्य करतो. "सरोवर" हे जीवनाचे किंवा मानवी मनाचे प्रतीक वाटते, तर "प्रतिबिंबांची वलये" हे मनातील विचार, भावना वा स्मृतींचे प्रतीक असल्याचे जाणवते. विचार, भावना, आठवणी या कधीच स्थिर राहत नाहीत. सतत हलत राहतात. यातून जीवनातील अंतःस्थ सखोलता शायराने प्रभावीपणे मांडली आहे.
गझलेतील शब्दकळा जर भावनिक, लयबद्ध आणि सौंदर्यपूर्ण असेल, तर ती निश्चितच रसिकांना आपलसं करते. मात्र ती साधी पण प्रभावी असायला हवी.
गझल ही शब्दांची एक सुंदर अनुभूती आहे. तिच्यातून शब्दांच्या शक्यता विस्तारतात आणि वाचकाच्या अंतःकरणात आपलं स्थान शोधतात.
गझलेतील प्रत्येक शब्द हा कविमनाच्या अनुभवांचा आणि भाषिक संवेदनशीलतेचा नकाशा असतो. म्हणूनच गझल पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते. लिहावी वाटते.
स्व. विजय आव्हाड सरांचा असाच एक शेर पाहुयात
"खाटकाचा हात चिरला एक मेंढी कापतांना..
जखम बांधू लागला घायाळ तुकडा लोकरीचा.!.."
हा शेर वाचून कोणीही थक्क होऊन जाईल. यातील प्रतिकांवर विचार केला, तर एकीकडे मेंढीला कापणे ही क्रूरता आहे, तर दुसरीकडे तिच्याच लोकरीने खाटक स्वतःची जखम बांधतो केवढा गहिरा विरोधाभास!
"लोकरीचा तुकडा" हा ऊबदार असतो, ही ऊब स्नेह, माया, करुणा, संवेदना, पश्चात्ताप यापैकी कशाचीही असू शकते.
या शेरातून सूचित होते की, हिंसेतूनही करुणा उगम पावू शकते. खऱ्या अर्थाने या शेरातून मानवी स्वभावाचे दर्शन घडून येते. मागील काही महिन्याआधी शेर म्हणजे एक प्रकारचा सुतळी बॉम्ब हा एक छोटासा लेख मी लिहिला होता तो इथे आठवला त्यात मी लिहिले होते की ज्याप्रमाणे सुतळी बॉम्बाची रचना केलेली असते, त्याच पद्धतीने एक उत्तम गझलचा शेरही तयार केलेला असतो.
शब्दांच्या आवरणात अनेक अर्थांची, आशयांची स्फोटक शक्ती शेरात लपवलेली असते.
शायर त्या आशयाचा एक धागा जणू सुतळी बॉम्बाच्या वातीसारखा शेराबाहेर ठेवतो.
आणि रसिक जर त्याच्या विचारांची माचिस लावली, तर तो विचार स्फोटकपणे उमटतो… एक जबरदस्त "धमाका"!
निसार अख्तर काय सुंदर म्हणतात
"हम से पूछो ग़ज़ल क्या है, ग़ज़ल का फ़न क्या है
चंद लफ़्ज़ों में कोई आग छुपा दी जाए"
शब्द हेच शायराचे अस्त्र असतात. त्यांच्या सहाय्याने तो "आग" म्हणजेच तीव्र भावना, वैचारिक ठिणग्या, मानवी संवेदना लपवून ठेवतो.
आणि जर त्या शब्दांना विचारांच्या ज्योतीने पेटवले, तर तो शेर आयुष्यभर लक्षात राहील असा स्फोट घडवतो.
गझल म्हणजे फक्त काही दोन-दोन ओळी नाहीत, तर ती एक सूक्ष्म विस्फोटक शक्ती आहे अगदी सुतळी बॉम्बासारखी!
एकदा पेटली... की विसरणं अशक्य!
— सतिश गुलाबसिंह मालवे
अमरावती
हल्ली मुक्काम – शिक्रापूर,पुणे
मो. 9527912625


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!