मराठी गझल_खिळे ठोकून हृदयावर व्यथा जोपासता येते_सतीश मालवे_satish malve_
खिळे ठोकून हृदयावर व्यथा जोपासता येते
किती खंबीर आहे मन जगाला दावता येते
कसे येणार दुःखानो तुम्ही चालून माझ्यावर
सुखाच्या रक्षणासाठी मलाही भांडता येते
उन्हाशी झुंज देण्याची तयारी ठेवली ज्याने
(तयाला सावली खेचुन घरावर आणता येते)
तुझ्या गादीदुलाईची मला येथे गरज नाही
मला रेल्वेफलाटावर सुखाने झोपता येते
फुलांपासून शिकलो मी इथे जगण्यास लोकांनो
मला काट्यांमधे सुद्धा स्वतःला ठेवता येते
त्सुनामी पाहिली नाही तिने माझ्यातली केव्हा
तिला अंदाज अतिवृष्टी कदाचित लावता येते
शिवाने ठेवला आहे कृपेचा हात डोक्यावर
सतिशला त्यामुळे बहुधा हलाहल प्राशता येते