“एक पक्षी”ची पुरस्कार हॅट्ट्रिक; सतीश मालवे यांना आणखी एक राज्यस्तरीय मान
डोंबिवली : मराठी गझल क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय ठसा उमटवणारे गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे यांच्या “एक पक्षी” या गझलसंग्रहाला सलग तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळ तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कै. अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार २०२६ अंतर्गत विशेष “कै. अनिल साठे उल्लेखनीय गझलसंग्रह पुरस्कार” या संग्रहाला जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार येत्या १ मार्च २०२६ रोजी डोंबिवली येथे आयोजित राज्यस्तरीय हीरक महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती मंडळाचे कार्यवाहक व सुप्रसिद्ध गझलकार हेमंत राजाराम यांनी दिली.
विशेष म्हणजे, “एक पक्षी” या गझलसंग्रहाला अल्पावधीत मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय सन्मान आहे. यापूर्वी साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय स्व. मधुकर तांबोळी स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार या संग्रहाला प्राप्त झाला होता. तसेच समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे २०२५ सालचा सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कारही या संग्रहाला मिळाला आहे.
प्रकाशनानंतर वर्षपूर्तीही न झालेल्या या संग्रहाने सलग तीन राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत मराठी गझल क्षेत्रात स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. आशयघनता, भावस्पर्शी अभिव्यक्ती, सामाजिक भान आणि संवेदनशील मांडणी ही या संग्रहाची वैशिष्ट्ये मानली जात असून रसिक व समीक्षकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या यशाबद्दल बोलताना कवी सतीश मालवे यांनी आपल्या आई-वडिलांप्रती, गुरूजनांप्रती, वाचकवर्ग व समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत हा सन्मान त्यांना समर्पित केला असल्याचे सांगितले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्यविश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!