अतुल देशपांडे यांचे आत्म्याला भिडणारे शब्द
"मित्र म्हणून नाही तर रसिक म्हणून ऐक आणि मार्गदर्शन कर"
असे जेव्हा अतुल सर मला म्हणतात तेव्हा मी निशब्द होऊन जातो... कारण वरील शब्द केवळ विनम्रतेचा आविष्कार नाहीत, तर गझलेला आत्म्यापासून भिडलेला एक विनयशील शायर बोलतो आहे याची साक्ष आहे. गझल म्हणजे नुसती शब्दांची मांडणी नसते...ती एक शिस्तबद्ध आत्मअनुभूती आहे...हे ज्यांच्या वर्तनातून आणि लेखनातून ठळकपणे आपल्याला जाणवतं ते म्हणजे अतिशय उतुंग व्यक्तिमत्त्व श्री. अतुल देशपांडे सर आहेत हे मी ते माझे चांगले मित्र आहेत म्हणून बोलत नाही तर आजवर मी त्यांच्या गझल आणि त्यांच्या एकूणच सहवासात मला आलेला अनुभवावरून बोललो...
अतुल सरांच्या गझलांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटतो सजग, सौम्य आणि प्रामाणिकता त्यांच्या गझलेत उतरताना दिसतो...नाटकीपणा न करता गझलेतला खरेपणा साक्षात आपल्याला त्यांचा शेरात दिसून येतो.
गुणांची खाण आहे मी तरीही
मला शेखी मिरवता येत नाही
हा शेर म्हणजे नम्रतेच्या सौंदर्याची साक्ष आहे. ही केवळ आत्मपरीक्षणाची नोंद नाही, तर आत्मिक प्रगल्भतेचा आविष्कार आहे. गुण असणं ही एक गोष्ट आहे, पण ते न दाखवता राहणं ही खरी ‘शेखी’ असते.
जीवनाची कठोर आणि खरी जाणीव जर अनुभवावी असेल तर ती अतुल देशपांडे सर यांच्या गझलातून आपल्याला अनुभवता येते... मृत्यूला पूर्वसूचना नसते. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, ते एका शेरात म्हणतात:
जे करायचे जेव्हा, ते करून घे तेव्हा
काळ वेळ मृत्यूची घोषणा कुठे करतो.
विचार केला तर गझल ही केवळ कलाकृती नाही, ती एक आत्मज्वाला आहे. आपले म्हणणे नेमकेपणाने सांगण्याचं एक कौशल्य असते. कवितेतील ताकद ही शब्दांत नसते, ती अनुभवात असते, हा शेर त्याचेच एक द्योतक म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये:
व्हायला सुंदर गझल नस सापडावी लागते
आतमध्ये एक ठिणगी जाळ व्हावी लागते
गझल वाचायला आणि समजायला जितकी सोपी वाटते, तितकी ती लिहायला सोपी नसतेच, कारण एका जमून आलेल्या शेरामागे गझलकाराची मेहनत असते. त्याने त्या दोन ओळींसाठी अवघी प्रतिभा पणाला लावलेली असते.
आईच्या कष्टांची आणि दारिद्र्याच्या असहायतेची अंतर्मुख करणारी नोंद म्हणजे वरील शेर! माय भुकेला थोपवण्याचा प्रयत्न करते, पण भूक जेव्हा प्राणघातक बनते, तेव्हा तिची सारी तगमग हतबल ठरते हे किती नेमकेपणाने वरील शेरामध्ये व्यक्त केल्या गेले आहे:
सांडलेले पीठ गिरणीतून गोळा माय करते
पण भुकेने लेकराचा जीव होता घेतला
अजून याच अंगाने आलेला एक शेर:
चार दाणे ठेवते खिडकीत आई पाखरांना
साठ पोते धान्य पिकते बाप माझा बोललेला
इथे घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत.. तर त्या भिंतींत मायेची ऊब आणि श्रमाचं सोनं मिसळलेलं असतं. हा शेर त्या कुटुंबाच्या मूळमूल्यांची जाणीव करून देतो.
मध्यरात्री फोन येतो, वाढते धडधड तशी
पाल चुकचुकते तशातच आणि भरते कापरे
थरकाप उडवणारा अनुभव काळजी, भय आणि अशांततेचा त्रिवेणी संगम या शेरात चांगला उतरून आलेला आहे. केवळ दृश्यात्मकतेसाठी नाही तर जाणीवा हलवण्यासाठी हा शेर जन्माला आला आहे. असे वाचता क्षणी वाटून जाते.
काढले चित्रात मी अश्रू तिचे
खोडरबराने कसे खोडायचे
कला आणि भावना यांचा परस्परसंबंध सांगणारा हा शेर म्हणजे आठवणीचे प्रसंग अधोरेखित करणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. भावना जर वास्तवात उतरल्या, तर त्या मिटवल्या जात नाहीत. हे यातून अतुल सरांनी स्पष्ट केल्याचे जाणवते.
भिंत सामायिक होती आमच्या दोघांमधे
दोन डोळ्यांच्या प्रमाणे भेटलो नाही कधी
हे शेर केवळ वास्तुरूपक नसून माणसांतील भावनांचे प्रतीक आहे. इतकी जवळ असूनही एकमेकांशी न जुळणं हे आजच्या नात्यांचं मूळ दुःख या शेरात दिसून येत.
केवढी पक्ष्यांत चर्चा झाड सुकल्यावर
कोण उरते सांग हिरवेगार कायमचे?
हा शेर निसर्गदृष्टीतून समाजदृष्टीकडे नेतो. आधार गमावल्यावरच त्याचं महत्त्व कळते.. हा सार्वत्रिक आणि कालातीत संदेश किती कमी शब्दात दिला आहे.
अतुल देशपांडे सर हे फक्त गझलकार नाहीत, ते एक अनुभव सांगणारे संयमी शिल्पकार आहेत. त्यांच्या गझलेत केवळ शेर नसतात, तर एका खोल विचारविश्वाचा आविष्कार असतो. त्यांच्या या विनयशीलतेतून आणि आत्मनिष्ठतेतून गझल एक नवा अर्थ घेऊन आपल्यासमोर येते.
हे लेखन म्हणजे केवळ शेरांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न नव्हता तर त्या एका दडलेल्या संवेदनशील व्यक्तीची ओळख करून देण्याचा प्रयत्न होत.. त्यांच्या लेखणीतून गझल ही सौंदर्य, सच्चाई आणि साधेपणाचा सुरेल संगम कसा असतो, हे शिकण्यासारखं आहे. म्हणून हा लेखन प्रपंच मांडला आहे.
धन्यवाद!!
– सतीश गुलाबसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!