बघा मुर्दाड कसले जाहलो आहोत आपण_मराठी गझल सतिश मालवे

 बघा मुर्दाड कसले जाहलो आहोत आपण_मराठी गझल सतिश मालवे

गुलाबीगझल



बघा मुर्दाड कसले जाहलो आहोत आपण

कधीचे सोंग घेउन झोपलो आहोत आपण


गुलाबांना कुठे स्वातंत्र्य जगण्याचे मिळाले

जरी काट्यांबरोबर झुंजलो आहोत आपण


सतत का पोळण्याची राहते भीती मनाला

उन्हाच्या तीव्रतेने ग्रासलो आहोत आपण


जरासा टाकला चारा गुरांना,आणि कळले

भुकेच्या दावणीला बांधलो आहोत आपण


समुद्राखालचे मोती कसे मिळतील सांगा?

मजा मारत तिरावर थांबलो आहोत आपण


उगवलो त्याच जागेवर दिसू आपण उद्याला

जरी मातीमधे या गाडलो आहोत आपण


खडे मारून डोहाला असा आनंद लुटला

तरंगांच्या ध्वनीवर नाचलो आहोत आपण


कसे नाते तुझे माझे तुटावे सांग कविते!

गझलच्या साखळीने बांधलो आहोत आपण


- सतिश गु.मालवे,मुऱ्हादेवी, अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!