अनावर अश्रूंना आवर घालणारी 'दस्ती' सतिश मालवे
अनावर अश्रूंना आवर घालणारी 'दस्ती'
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेस पात्र ठरलेला सुप्रसिद्ध गझलकार श्री.निलेशजी कवडे यांचा 'दस्ती' हा गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला,पायगुण प्रकाशन अमरावती या नामांकित प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित झालेल्या या संग्रहाचे अत्यंत सुबक आणि लक्ष वेधून घेणारे बोलके मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार श्री.विष्णू थोरे,चांचवड यांनी साकारले असून महाराष्ट्राचे लोकप्रिय जेष्ठ गझलकार आदरणीय श्री.शिवाजीराव जवरे सरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहास लाभली तसेच ख्यातनाम जेष्ठ गझलकार आदरणीय श्री श्रीकृष्ण राऊत सरांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य आदरणीय जेष्ठ साहित्यिक,कादंबरीकार श्री.पुष्पराजजी गावंडे साहेबांनी कवीचा परिचय या दस्तीवरी लिहून दिला आहे.अर्थातच ह्या सर्व बाबी दस्ती संग्रहाची उंची दाखविणाऱ्या आहेत.
अत्यंत साध्या सोप्या व अगदी कमी शब्दात आपल्या गझलेतील आशय जिवंत करून रसिकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील नावाजलेल्या गझलकार यादीत निलेशजी कवडे यांचे नाव आदराने घेतले जाते.हे नाव आदराने का घेतले जाते तर याचा प्रत्यय आपल्याला 'दस्ती' हा गझलसंग्रह वाचून येईल यात शंकाच नाही, रसिकांनी एकदा हा संग्रह नक्कीच आस्वादायला हवा असे मला तरी वाटते.
एका बैठकीत वाचून काढायला भाग पाडणारा हा संग्रह रसिकांना एका वेगळ्या जगात घेऊन जाणारा आहे, आता हाच शेर बघा
हवेचा झोत येतो अन दिव्याची ज्योत विझते
किती अलगद,अचानक प्राण 'तो' उचलून घेतो
हा शेर वाचल्यावर मनात येते की हवा आल्यावर दिवा विझणारच की त्यात काय नवीन, मात्र या शेरावर अजून थोडा बारकाईने विचार केल्यावर लक्षात येते की सदर शेर सजीवसृष्टीवर भाष्य करणारा आहे.आपल्या शरीरात नित्य तेवत असणारी प्राणवात कधीतरी विझणारच आहे आणि ही प्राणवात विझवणारी हवा जेव्हा आपल्या जीवाची ज्योत विझवून जाते तेव्हा खरच किती अलगदपणे हा जीव शरीर सोडून जातो हे वेगळं सांगायची गरज पडू नये,म्हणून म्हणतो की निलेशजी कवडे यांची गझल वाचकाला वेगळ्या जगात घेऊन जाणारी एक अप्रतिम अभिव्यक्ती आहे.
आभाळाची उंची व समुद्राची खाली लाभलेला एक अप्रतिम शेर असा
ब्रम्हांडही व्यापून घेते पोकळी माझ्यातली
येथे जरी अस्तित्व माझे टिंब असल्यासारखे
एवढेच नव्हे तर निलेशजींच्या 'दस्ती' मध्ये वाचकांना कधी 'प्रेम'कधी 'विरह' कधी 'जनसामान्यांचे जीवन' तर कधी बळीराज्याची व्यथा तर कधी मातृप्रेम ओसंडून वाहताना दिसेल हा शेर पाहू
हमेशा लेकरासाठी तिची धडपड सुरू असते
म्हणुन दुर्योधनाला लाभले ज्वाज्वल्य डोळ्यांचे
दुर्योधनासारखा क्रूर अत्याचारी,अधर्मी मुलगा जरी आईच्या पोटी जन्माला आला तरी तिची माया ममता प्रेम आपल्या लेकासाठी कमी होत नसते.आपल्या मुलाच्या हितासाठी माय कशी डोळ्यांचे तेज आपल्या लेकास प्रदान करते व त्याचे शरीर वज्राचे करू शकते हे आपल्याला प्रस्तुत शेरात पहायला मिळते.
निलेशजी कवडे हाडामासाचे शिक्षक असल्याने त्यांना मुले घडवत असताना जो अनुभव आलेला आहे तोच त्यांच्या शेरातून त्यांनी व्यक्त केलेला दिसतो स्वानुभवातून जे लेखणीत उतरले खरच ते किती कमाल असते याची अनुभूती देणारा हा शेर
शिष्यवृत्ती, पुस्तके,गणवेश,शापोआ
योजनांची पालखी वाहायला गुरुजी
किती कमाल आहे ना हा शेर
अजून एक अप्रतिम शेर असा की
शक्यता आहे जुने जमतील विद्यार्थी
काढली आहे जुनी शाळा लिलावाला
निलेशजी कवडे यांच्या गझलनेने अनेक प्रकारच्या विषयांना हात घातलेला आहे प्रेमाचे प्रतीक असणारी दस्ती त्यांच्या गझलेत काही अशाप्रकारे उतरली की " व्वा क्या बात है" असे आपसूकच तोंडातून बाहेर पडावे एखाद्या प्रियकराने आपल्या मनातील भाव प्रियेसीला कळण्यासाठी एखादे लिहिलेले प्रेमपत्र कवडे सरांच्या गझलेतून कसे दस्तीच्या रूपाने येतात व संग्रहाच्या नामकरणाला योग्य तो न्याय देऊन जातात हे 'दस्ती' या गझलेतील हा शेर सांगून जातो.
नेहमी का फक्त कागद वापरावा
पत्र लिहिले मी तिला घेऊन दस्ती
किंवा
बांधली जखमेस होती,त्याच दस्तीने
आजवर हिरवी दुखापत ठेवली आहे
मराठी गझलेला समृद्ध करणारी ही 'दस्ती' कधी कधी अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांवर चालून जाण्याचे धाडस करते. हा शेर बघा
रूढींना तोच दरवाजा खुला असतो
जिथे दारात उलटा बाहुला असतो
निलेशभाऊंच्या गझलेतील शेर तर हृदयाला चर्रर्र करून जातात तर काही शेर मनाला चटका देऊन जाण्याचे काम करतात सर्वसामान्य माणसांची होरपळ बळीराजाची व्यथा मांडताना कवडे सर म्हणतात
पावसा तू साथ यंदा सोडली तर मी
सांग सांभाळू कसा संसार मातीचा
किंवा
शेवटी फोडावया घागर ढंगाची
एक वेडा मारतो गगनात पत्थर
अजून एक शेर असा की
मिळणार का दिलासा यंदा तरी मला
पेरून चार दाणे बघतो नभाकडे
एक शेर असाही
फक्त ओला वा सुका दुष्काळ नाही
कास्तकारांना व्यवस्था लुटत असते
'वाह' ते 'आहह' श्रेणीमध्ये मोडणारे असे अनेक शेर आपल्याला कवडे सरांच्या दस्ती संग्रहात वाचायला मिळतात. त्यापैकी मला अत्यंत भावलेले काही निवडक शेर
मी कपाळावर चिरंजीवी ठसा जपतो
मी पुरातन वेदनेचा वारसा जपतो
छत उगाचच एकटक नाही बघत रात्री
मी तणावाची छतावर अवदसा जपतो
**
शेवटी करतो मला पुतळा विनंती
झाक मजला साजरी झाली जयंती
**
फक्त दृष्टिकोन बघण्याचा बदल मित्रा
बायकोसुद्धा तुझी ऐंजल असू शकते
**
बैठकीला तू हजेरी लाव नाहीतर
आजची चर्चा तुझ्याबद्दल असू शकते
**
झोपडीला मग मिळाले तेज सोनेरी
जाळल्यावर रात्रभर कंदील अश्रूंवर
बोलतांना नेमका तू टाळला होता
शेवटी आलाच ना तपशील अश्रूंवर
***
होत नाही थोरला केवळ वयाने
लागते अंगात दादा थोरलेपण
**
वाजवू टाळ्या पुढेही वाजवत राहू
शेवटी आहोत ना प्रेक्षक तुम्ही आम्ही
***
मी फुलासारखे काय जगलो इथे
तोडतो रोज मजला कुणी ना कुणी
**
कपाटातील आजीचा जुना बटवा बघू का
तिथे काही जुनी नक्कीच सापडतील नाणी
असे शेर वाचून निलेशजींच्या प्रगल्भतेची उंची आपल्या लक्षात येते कवडे सरांची शायरी खरच वाखाणण्याजोगी आहे माझे अत्यंत आवडीचे गझलकार असलेले कवडे सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट पाचव्या युवा साहित्य संमेलनात अकोला येथे झाली व एक चांगले व्यक्ती, मार्गदर्शक,एक मित्र म्हणून त्यांच्याविषयी अजूनच आदर वाढत गेला, काही गझलमुशाऱ्यात त्यांच्या सोबत गझल सादरीकरण करण्याचा योग आला हे माझ्यासाठी तर फारच मोठी गोष्ट!
दर्जेदार संग्रहाची निर्मिती केल्याबद्दल श्री.निलेशजी कवडे सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो
- सतिश गु.मालवे
मुऱ्हादेवी,(अमरावती)
ह.मु.शिक्रापूर, पुणे
9527912625

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!