फक्त फासा टाकणे जमते मला\मराठी गझल सतिश मालवे
फक्त फासा टाकणे जमते मला
डाव कोठे साधणे जमते मला
या ऋतूंचा काय मी धावा करू
(वाळवंटी उगवणे जमते मला)
ढाल आहे बाप नावाची जवळ
त्यामुळे तर जिंकणे जमते मला
गुण उतरल्याने तिचे रक्तामधे
लेकरू सांभाळणे जमते मला
पुस्तके अभ्यासली नसली तरी
चेहऱ्यांना वाचणे जमते मला
पर्वतांनो आडवे येऊ नका
मार्ग माझा काढणे जमते मला
काय मृत्यूची भिती वाटायची
जीव हाती ठेवणे जमते मला
- सतिश गुलाबसिंह मालवे
मुऱ्हादेवी, अमरावती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!