चढवतो बाण शब्दांचे विचाराच्या धनुष्यावर Satish Malve गझल

चढवतो बाण शब्दांचे विचाराच्या धनुष्यावर Satish Malve गझल 



चढवतो बाण शब्दांचे विचाराच्या धनुष्यावर

कवी साहित्य नावाच्या रणामध्ये उतरल्यावर


किती उपकार पर्जन्या..तुझे झालेत अमुच्यावर 

सरी तत्काळ पाठवल्या सुका दुष्काळ पडल्यावर


नितळता काय कामाची तशीही सांग वरवरची

गढुळ होतेच ना पाणी तळाशी गाळ असल्यावर


कधी येणार लाटांनो तुम्ही भेटायला मजला 

कधीपासुन उभा आहे समुद्राच्या किनाऱ्यावर


तुझ्या पायांमधे काटे कधी टोचू नये म्हणुनी!

फुले मी टाकली होती तुझ्या प्रत्येक मार्गावर


घरी येण्यास लेकीला जरासा वेळ झाला तर

"पिता माझ्यातला नाही बसत एका ठिकाणावर"


दिवा होऊन दुनियेच्या तिमीराशी लढत असतो

तरी देखील दावा मी..कधी केला न सूर्यावर


दिवस दुःखातले माझ्या कसे विसरून जाऊ मी?

जरासा जीवनामध्ये सुखाचा काळ आल्यावर


दशा माझ्या मनाचीही समुद्रासारखी व्हावी

मनापासून एखादी....नदी भेटून गेल्यावर



- सतिश गुलाबसिंग मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!