माझा आवडता गझलकार : गणेश नागवडे सर | maza aavdta gazalkar

माझा आवडता गझलकार : आ. श्री. गणेश नागवडे

✒️ रसिक – सतिश गुलाबसिंह मालवे


स्नेहगझल समूहामध्ये सुरू असलेल्या ‘माझा आवडता गझलकार’ या सुंदर उपक्रमासाठी संयोजिका अंजलीताई दीक्षित यांचे मन:पूर्वक आभार! त्यांनी या उपक्रमाला उत्तम प्रकारे हातभार लावला आणि माझ्यासारख्या अंतर्मुख रसिकालाही व्यक्त व्हायला प्रेरणा दिली. समूहात येणाऱ्या दर्जेदार पोस्ट पाहून मला देखील वाटले की मला या उपक्रमात सहभागी व्हावे, काहीतरी लिहावे.

मी एक वाचक, एक गझलप्रेमी म्हणून माझ्या आवडत्या गझलकाराची ओळख त्यांच्या शेरांमधून करून देण्याचा प्रयत्न करतो.

गझल म्हणजे केवळ शब्दांची कसरत नाही; ती हळव्या भावना, नाजूक संवेदना आणि अंतर्मनातील तरल पडसादांनी आकारलेली सर्जनशील अभिव्यक्ती आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर गझल आपल्याला नकळत साथ देते. विरह, एकांत, सौंदर्य, दु:ख आणि गूढता यांचे सूक्ष्म पदर उलगडतात.

मराठी गझलविश्वात अनेक प्रतिभावान गझलकार आहेत. पण ज्यांनी माझ्या मनात खोलवर घर केलं, त्यांपैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे श्री गणेश नागवडे सर.

मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही किंवा संपर्क नाही तरीही अनेक वर्षांपासून त्यांचे फेसबुक फ्रेंड म्हणून त्यांचे लिखाण नियमित वाचतो. त्यांचे शेर आणि गझल माझ्या हृदयाला भिडतात. त्यांच्या फेसबुक वॉलला मी अधूनमधून भेट देतो, नवीन पोस्ट पाहतो, आणि त्यांच्या शब्दांशी संवाद साधतो. या संवादातून एक अदृश्य मैत्रीची जुळवण होते.

त्यांच्या गझलांनी मला नेहमी नव्याने भावनिक धरसोड दिली, मनाच्या गाभ्यात उतरली आणि रुजली. त्यांच्या लेखनातून केवळ वाचणे नव्हे तर अनुभवण्याचा अनुभव मिळाला. त्यांचा प्रत्येक शेर वेदनेचा नवा पदर उघडतो. त्यात आयुष्याच्या गूढतेची झलक आणि त्याहूनही अधिक काहीतरी अंतर्मनातील गूढ आहे.

“माझे दु:ख समाधीमध्ये मावू शकले नाही
मी माझ्या ज्ञानाची दुखलेली आळंदी आहे”

या ओळींमध्ये दु:खाचं आध्यात्मिक रूपांतरण पाहायला मिळतं. ‘समाधी’, ‘ज्ञान’, ‘आळंदी’ हे प्रतीक अंतर्मनाच्या प्रवासाची आणि तत्त्वज्ञानाची गुंतागुंत दर्शवतात.

“मी तुकाराम खोल दुखलेला
आत माझ्या सुने सुने देहू”

‘तुकाराम’ हे केवळ संत नाही, तर वेदनेचा आवाज आहे. ‘देहू’ हे ठिकाण नसून शोकावलेली अंतःस्थिती आहे.

श्री गणेश नागवडे यांचे पाच गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत, ज्यांनी मराठी गझल साहित्यात समृद्धी आणली आहे. त्यांच्या गझलसंग्रहांची नावे अगदी हळवी, अर्थपूर्ण आणि भावपूर्ण आहेत:

  • “व्याकुळ हरणाच्या गोष्टी”
  • “डोहाचे व्याकुळ संदर्भ”
  • “मनाच्या बैचेन फांदीवर”
  • “काचेची घरे आपण”
  • “दुःखाची दुसरी आवृत्ती”

या शीर्षकांतूनच हळव्या भावना, संवेदनशीलता, आणि मानवी मनाचा वेदना-भरा अनुभव जाणवतो. काही निवडक शेर पाहूयात:

“डोहामधले डोळे पाहत बसलो आहे
मी हरणाचे डोळे पाहत बसलो आहे”

हे डोळे केवळ दृश्य नाहीत; ते खोल भावभावनांचे प्रतिबिंब आहेत.

“बाईमध्ये असणाऱ्या गहिऱ्या डोहाच्या गोष्टी
मी पोरीला सांगितल्या व्याकुळ हरणांच्या गोष्टी”

‘बाई’ केवळ स्त्री नाही, ती अनुभवांची सजीव सृष्टी आहे, तिच्या गाभ्यात भावविश्व आहे, जे पिढ्यान्पिढ्या पोहोचवले जाते.

“तुला जाळीत दिसले दात वाघाचे
मला पाण्यात दिसला पाय हरणाचा”

ही ओळी वास्तवाशी निगडित, जीवंत प्रतीके वापरून प्रचंड संवेदनशीलता उभी करतात.

“शांतपणे हा सगळा प्रकार पाहत बसणे
महिनाअखेर उरला पगार पाहत बसणे”

हा शेर मध्यमवर्गीय माणसाच्या रोजच्या संघर्षाचा आणि विवंचनेचा आरसा आहे.

“भल्या थंडीत गेला जीव भिकाऱ्याचा
किती रडली पहा दर्ग्यावरी चादर”

श्रद्धा आणि वास्तव यांचा विदारक संघर्ष यातून दिसून येतो.

“अचानक थांबला हबकून वाजंत्री
मिठीमध्ये मुलीच्या बाप रडल्यावर”

लग्नाच्या आनंदाच्या क्षणांमध्ये हृदयाला भिडणारा भावनांचा उद्रेक.

“यामुळेच तर तुला विसरणे सोपे गेले
तुझ्याहूनही सुंदर माझी मुलगी होती”

वरवर पाहता बोचरा वाटणारा हा शेर, जीवनातील कटू अनुभवांची खूण आहे.

मी त्यांचे हे पाचही संग्रह संग्रही ठेवले आहेत. अधूनमधून त्यांची गझले पुन्हा वाचतो. या सर्वांतून मला जाणवले की गणेश नागवडे हे संवेदनशील मनाचे कवी आहेत.


गणेश नागवडे हे माझ्यासारख्या असंख्य गझलप्रेमी रसिकांच्या भावविश्वाचे सहप्रवासी आहेत. त्यांचे शेर वाचताना असे वाटते की हे शब्द माझ्या हृदयातीलच आहेत आणि मला स्वतःलाच लिहायला पाहिजेत होते. ते फक्त गझलकार नाहीत, तर भावनांचा शब्दसखा आहेत. म्हणून ते माझ्या आवडत्या गझलकारांच्या यादीत अग्रस्थानावर आहेत.

धन्यवाद!

— सतिश गुलाबसिंह मालवे
९५२७९१२६५
(एक गझलप्रेमी रसिक वाचक)


टीप: हा लेख सुरुवातीला स्नेहगझल समूहाच्या ‘माझा आवडता गझलकार’ उपक्रमासाठी लिहिला गेला होता. आज या लेखाला कायम ठेवण्याच्या उद्देशाने, त्याचा मी माझ्या ब्लॉगवर "गुलाबीगझल" पोस्ट केला आहे. गझलप्रेमी रसिकांनी या लेखाचा मनापासून आस्वाद घ्यावा हीच माझी इच्छा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!