सुप्रसिद्ध गझलकार RK Aathvle यांनी एक पक्षी या गझलेचे केलेले रसग्रहण

गझल रसग्रहण 

सुप्रसिद्ध गझकार सतिशसिंह मालवे सर यांच्या 'एक पक्षी' या गझलेचे रसग्रहण..... 

गावाकडून आला शहरात एक पक्षी...
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी... 

अंधार जीवनाचा करण्यास दूर अंती...
सूर्याकडे निघाला रागात एक पक्षी ... 

पाहून झेप त्याची आश्चर्य होत आहे...
झाला असेल मोठा त्यांच्यात एक पक्षी... 

लावून एक डोळा टिपला अचूक पक्षी...
आहे अजून माझ्या स्मरणात एक पक्षी... 

सोडून देश माझा आलो उगाच येथे...
चिंता करून मेला विरहात एक पक्षी... 

कुंकू तुझ्या कपाळी पाहून आज माझे...
रुसला असेल बहुधा लग्नात एक पक्षी... 

सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो...
दिसतो मला हमेशा बापात एक पक्षी... 

__ © सतिशसिंह मालवे 

कविता, गझल असो की ललित लेखन ते वाचत असतांना आपण त्यात गुंतून पडतो. भावविभोर होतो. त्यातील भावार्थ आपल्या मनातील भावनांना छेडून जातात. गझलेतील एखादा शेर वाचतांना आपसुकच तोंडातून 'वाह' अशी दाद बाहेर पडते तर कधी-कधी सरकन् अंगावर काटा येतो. याचे कारण म्हणजे तो शेर आपल्या काळजाळा भिडतो. त्यातला भावार्थ आपल्या जगण्यात अनुभवलेला असतो. 

   'एक पक्षी' हि आनंदकंद वृत्तातील एक सुंदर गझल आहे. या गझलमधे त्यांनी *एक पक्षी* हा एक हटके रदीफ खूपच सहजपणे निभावल्याचे आपल्या लक्षात येईल. 

नव्या उमेदीने, आत्मविश्वासाने नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत खेड्यातून शहरात आलेला व्यक्ती येथील वातावरण पाहून, धावपळ पाहून गोंधळून जातो. भाषेतील, राहणीमाणातील अंतर पाहून व स्वतःतील न्युन जाणवल्याने स्वतःच वरमून जातो.भावभावनांना थारा नसलेल्या, शेजाऱ्याला शेजाऱ्याचा पत्ता नसलेल्या आणि भौतिक सुखाच्या मागे लागून जगण्याचा निखळ आनंद हरवून बसलेल्या यांत्रिक मानवाचे शहर पाहून हबकून गेलेल्या व्यक्तिबद्दल गझलकार लिहितात, 

*गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी* 

या शेरामधे गाव आणि शहर या प्रतिकांचा फार चांगला वापर केलेला आपल्याला आढळून येतो.

अंधारात खितपत पडलेल्यांना आणि पोटाची आग विझवण्यासाठीच ज्यांची जन्मजात धडपड चाललेली असते त्यांना इतर सुखाच्या गोष्टींबद्दल विचार करायलाही कुठे वेळ असतो? अज्ञान, अस्वस्थता, अस्थिरता, अवमान आणि अवकळा यांच्या साथसंगतीत जगतांना मनात खदखदत असलेला ज्वालामुखी एकदम बाहेर पडावा, आपल्या अस्तित्वाची, अधिकाराची जाणिव व्हावी आणि या जन्मजात पाचविला पुजलेल्या दारिद्रयातुन बाहेर पडण्याच्या संतापाने मनात क्रांतीची ठिणगी पडल्याने त्याची पाऊले प्रकाशाच्या, प्रगतीच्या दिशेने पडणारच! त्यामुळे अगदी साध्या आणि सरळ शब्दात पण तेवढाच ताकदीचा शेर येतो,
*अंधार जीवनाचा करण्यास दूर अंती
सूर्याकडे निघाला रागात एक पक्षी* 

यामधे अंधार  आणि सुर्य म्हणजे प्रकाश या शब्दांच्या चपखल वापरामुळे शेर वाचकाच्या मनाला भिडतो. 

पुढचा शेर वेगळ्या धाटणीचा आहे. 

*पाहून झेप त्याची आश्चर्य होत आहे
झाला असेल मोठा त्यांच्यात एक पक्षी* 

अनेक व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. अथक परीश्रम घेत असतात पण मनासारखे यश मिळेलच असे नाही. काहीजण तर पार निराशेच्या गर्तेत जातात. सारखेच शिक्षण, कौशल्य प्राप्त करणारे सारेच जण सारखेच यशस्वी होतील असेही नाही. एखाद्याच्या  नशिबी मात्र फारसे श्रम न घेता ते मोठेपण येते. आपलाच समवयस्क सहकारी मोठ्या पदावर किंवा व्यवसायात आश्चर्यकारक झेप घेतो. या शेरामध्ये आणखी एका अर्थाची छटा दडलेली आहे. वाममार्गाने, आडमार्गाने मोठे होणारेही काही कमी नाहीत. त्यांचीही झेप जगासाठी आश्चर्यकारकच ठरते. 

सतिशसिंहजी पुढच्या शेरात म्हणतात, 

*लावून एक डोळा टिपला अचूक पक्षी
आहे अजून माझ्या स्मरणात एक पक्षी* 

जी गोष्ट मिळवायची आहे, जे ध्येय गाठायचे आहे, त्यासाठी आपल्याला एखाद्या साधकाप्रमाणे सारे काही विसरून फक्त ध्येयावरच लक्ष केंद्रीत करावे लागते. भोवतालच्या जगाचा विसर पडावा लागतो. तेव्हाच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. प्रेमात पडलेल्या प्रियकराला जसे रात्रंदिन डोळ्यासमोर आपली प्रिय व्यक्तिच दिसत असते. तो वेगळ्या जगात असतो. तिला मिळविण्यासाठी तो धडपडत असतो. आणि ती व्यक्ती जेव्हा त्याला मिळते तेव्हाच ती धडपड थांबते. पण प्रिय व्यक्तिची प्राप्ती झाल्यावरही तिची आयुष्यभर साथ मिळेलच असे नाही. असफल प्रेमकथांनी हे जग भरलेले आहे. अनेकांची ताटातूट झालेली असली तरी मनाचे काय? मनाची ताटातूट कोण करेल? हृदयाच्या कप्प्यात, स्मरणात ती व्यक्ती अंतिम क्षणापर्यंत घर करून बसलेली असते.  येथे हा शेर वाचतांना डोळा हा शब्द अर्जुनाचेही स्मरण करून देतो. बालपणी धर्नुविद्येचे शिक्षण घेतांना पक्षाचा डोळा टिपल्यानंतर पुढील आयुष्यात शत्रु किंवा सावजाचा अचूक वेध घेतांना त्यांच्यामध्ये अर्जुनाला तो पक्षी किंवा त्याचा डोळाच दिसत असेल काय? असा विचार मनाला चाटून जातो. 

देश सोडून परदेशी गेलेली माणसे, आपल्या जिवाभावाच्या माणसातून दुरावतात. अनेक कारणांमुळे स्थलांतरीत झालेली माणसे यशस्वी होतीलच असे नाही. तिथे गेल्यानंतरही घरच्यांसाठी आपण काही करू शकत नाही या चिंतेनेच तो ग्रस्त राहतो व त्यांच्या विरहाने व्याकुळ होतो. देश, राज्य, गाव सोडून जाणाऱ्याची आंतरीक तळमळ पुढील शेरात येते. 

*सोडून देश माझा आलो उगाच येथे
चिंता करून मेला विरहात एक पक्षी* 

पुढे एक नाजूक, अंतर्मुख करणारा पण गंमतीशीर शेर येतो. 

*कुंकू तुझ्या कपाळी पाहून आज माझे
रुसला असेल बहुधा लग्नात एक पक्षी* 

हा शेर वाचल्यानंतर खरे तर मला हसू आले. लग्नमंडपात ह्रदयभंगाने व्याकुळ झालेला, आपल्या प्रेयसीचे लग्न पाहणारा एक अभागी प्रेमी दिसला. पण तो एकतर्फी प्रेम करणारा किंवा मागणी घालून अपयशी झालेला उपवर मुलगाही असू शकतो. पण यापलीकडेही यामधे अर्थ दडलेला आहे. आज समाज कितीही पुढारलेला असला तरी मुलींना भावी आयुष्यातील जोडीदार निवडण्याची मुभा कितपत आहे? हि टक्केवारी नक्कीच आहे. आजही ठरवून दिलेल्या मुलांसोबतच मुलींना संसारासाठी उभे रहावे लागते. त्यामुळे कित्येक रुसलेले पक्षी पुढे तडजोडीने जीवन कंठत राहतात. 
येथे *कुंकू* ही प्रतिमा किंवा शब्द एकीकडे दोन जिवांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करायला कारणीभूत ठरत असतांनाच एकाचे (कदाचित दोघांचे) जीवन उध्वस्त करायला निघाला आहे. 

या गझलचा शेवटचा शेर किंवा मक्ता अफाट आहे.  यामधे बापाच्या कष्टाची महती व आपल्या बापाच्या कष्टाची किंमत समजून घेणाऱ्या मुलाच्या मनातील घालमेलही आहे. जीवनाच्या सर्व स्तरावर लढा देऊन, आपल्या अपत्यांच्या संगोपनासाठी झटणारा बाप गरिबीच्या झळा सोसत आपल्या पिलांसाठी चार घास मिळवितांना कष्टणाऱ्या, राबणाऱ्या पक्षाच्या प्रतिकातून आपल्यासमोर उभा राहतो. 

*सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो
दिसतो मला हमेशा बापात एक पक्षी* 

येथे विविध प्रतिमा आणि प्रतिकातून येणारा एक पक्षी बरेच काही सांगून जातो. त्याचबरोबर रदीफ निभावतांना येणारे पेचात, रागात, त्यांच्यात, स्मरणात, विरहात, लग्नात आणि बापात हे काफिये प्रत्येक शेराला एका उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळेच गझल रसिकांच्या मनात घर करून राहते. 

आर. के. आठवले 
9011895917

३ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!