ख्यातनाम गझलकार श्री.संदीप वाकोडे यांच्या किनारा गझल संग्रहाचे सतीश मालवे मुऱ्हा देवी यांनी केलेले रसग्रहण
-
अभिप्राय🙏
मला वेदनेचा सहारा मिळाला
मला आसवांचा किनारा मिळाला
इथे लोक सारे जरी ओळखीचे
कुठे एकही जाणणारा मिळाला
*"किनारा'* हा संदीपजी वाकोडे सरांचा दर्जेदार गझलसंग्रह प्रकाशनपूर्वच हातात पडला...संग्रहाचे आकर्षक असे मुखपृष्ठ आणि मागीलपृष्ठावर गझलनवाज आ.श्री.भीमरावदादा पांचाळे सरांनी संग्रहाचे शब्दसुमनाने केलेले कौतुक या संग्रहाची उंची दाखवतो!
गझलक्षेत्रात उल्लेखनीय असे नाव म्हणजेच आ.श्री संदीप वाकोडे सर फेसबुकच्या माध्यमातून वाकोडे सरांशी मला जुळता आले आणि बघता बघता आमची मने एकमेकांना जुळत गेली. योगायोग अकोला इथे झालेल्या पाचव्या युवा साहित्य संमेलनातल्या गझलमुशायरात खुद्द वाकोडे सर मुशायराचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली मला गझल सादर करता आली आणि वाकोडे सरांच्या आणखीन जवळ येता आले! किनारा गझलसंग्रह एका वेगळ्या धाटणीचा आणि चोवीस कॅरेट सोन्यासारखा शुद्ध असणारच ही पूर्वकल्पना आधीच असल्याने क्षणाचाही विलंब न लावता किनारा गझलसंग्रह मागवून घेतला कारण व्हाट्सऑप फेसबुकच्या माध्यमातून आजवर मी त्यांच्या अनेक गझल वाचत आलो, पूर्ण गझल वाचून झाल्यावर लिहिण्याचा मोह आवरता न आला, वाचलेल्या गझल आणि त्यातले शेर एकांतात आठवू लागले त्यामुळे म्हटलं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. एवढया मोठ्या गझलकाराच्या गझलवर लिहिणे हे माझ्या सारख्या पामराला काय जमायचे? परन्तु लिहिण्याचा मोह आवरता आवरत नव्हता म्हणून हा प्रपंच मांडून पाहत आहे.
परिस्थिती कोणत्याही असो यश मिळवायचे असेल तर प्रयत्न हे शंभर टक्के करावे लागतात,लाथ मारली तिथे पाणी निघायला पाहिजे,इतका प्रचंड माणसाचा स्वतःवर विश्वास असायला पाहिजे नुसतेच हातात भाग्यरेषा असून काहीच होत नाही तर धमक ही मनगटात पाहिजे असा प्रेरणादायी वृतांत मांडताना वाकोडे सर म्हणतात की
मी थांबणार नाही मी चालणार आहे
माघार मान्य नाही मी झुंजणार आहे
पाहू कशास सांगा हातात भाग्यरेषा
विश्वास मनगटावर मी ठेवणार आहे
अत्यंत साध्या सोप्या शब्दातुन आलेला हा मतला व शेर रसिकांवर मोहनी टाकण्याचे काम करतो आणि रसिकांना व्वा म्हणायला भाग पाडतो.
मानवी जीवन म्हणजे एक प्रकारचा खडतर प्रवासच आहे.जीवनात आल्यावर अनेक चांगले वाईट प्रसंग आपल्याला उपभोगायला मिळतात. जीवनाचा हा खडतर प्रवास कधीही न सरणारा रस्ता आहे जणू. कोणता प्रसंग कसा येईल हे कुणालाही सांगता येत नाही ज्यांच्या अंगी संयम स्थिरता आहे ती व्यक्ती कुठलाही प्रसंगी स्वतःला सावरू शकते.त्यामुळेच समयसूचकता कळणे ही फार मोलाची गोष्ट असते. वाकोडे सरांचा हा शेर त्याचेच एक धोतक असल्याचे जाणवते! हा शेर बघा
प्रवासी धुरंधर खरा तोच आहे
खरी वेळ ज्याला कळे थांबण्याची!
आजूबाजीची घोलमेल पाहून शायर व्यक्त होत असतो जसे की आपण जाणतोच की ईर्षा करून आजचा माणूस माणुसकी हरवून बसण्याच्या मार्गावर लागला आहे आजकाल माणसे एकमेकांचे पाय ओढण्यात इतके पटाईत झाले आहेत की भाऊ भावाचा गळा दाबायला मागे पुढे पाहत नाही.या राग लोभापायी माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे कदाचित त्यामुळेच शायराला असे वाटते
राग लोभाचा नको लवलेश आता
हा घुमो सगळीकडे संदेश आता
किनारा या संग्रहला संपूर्ण गझल अतिशय उत्तम असून वाचकाला एका वेगळा जगात घेऊन जाणाऱ्या आहेत अतिशय समपर्क आणि मोजक्या शब्दात कवी व्यक्त होत आहे
आत माझ्या चाललेला खल मनाचा
होत नाही शांत कोलाहल मनाचा
स्वार्थासाठी सर्वसामान्य माणसाची पिळवूनक करू पाहणाऱ्यां धोरणांना कवी टिपत असताना म्हणतात
मारल्या लाथा तरी दारात आले
लाजलज्जा सोडली आश्वासनांनी
किंवा
चल विचारू घोषणांच्या रोषणाईला
गाव माझे का बरे अंधारले आहे
वाकोडे सरांची गझल मानवी जीवनाबरोबरच सामाजिक भान,विद्रोह,प्रेम यातना विरह आंबेडकरी चळवळ शेतकऱ्यांची व्यथा अशा विविध विषयांनी निटलेली आहे. त्यामुळे ती सर्वसामान्यांना आपलीशी वाटते
हा संग्रह वाचून खूप ऊर्जा मिळाली अशा दर्जेदार संग्रह निर्मिती करणाऱ्या संदीपजी वाकोडे सरांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
ज्यांना हा संग्रह हवा असल्यास त्यांनी अवश्य मागवला पाहिजे अमेझॉन वर सुद्धा हा संग्रह उपलब्ध आहे.
पुस्तक विवरण
संग्रहाचे नाव
"किनारा" - संदीप वाकोडे मूर्तिजापूर
प्रकाशक - स म ग्र प्रकाशन, तुळजापूर
संग्रहासाठी संपर्क
9421832623 (फोन पे,गुगल पे)
9527447529
सुंदर अभिप्राय....👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद भाऊ
हटवासुंदर रसग्रहण
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवा