प्रेमा तुझा लिफाफा चुरगाळता न आला_मराठी गझल सतीश गुलाबसिंह मालवे
प्रेमा तुझा लिफाफा चुरगाळता न आला
प्रस्ताव भावनांचा नाकारता न आला
बैलासमान माझे जीवन असून सुद्धा
पोळा मला कधीही उपभोगता न आला
अख्खी गझल सुखाच्या वृत्तात बांधल्याने
आकांत काफियांचा सांभाळता न आला
आता तुझ्या स्मृतीचे मी लोणचे करू का
आंबा कधी प्रितीचा तर पिकवता न आला
सर्कस अशी बघितली मी जीवनामधे की
अभिनय विदूषकाचा साकारता न आला
लग्नामधे मुलीला निःशब्द बाप दिसता
आक्रोश लोचनांचा फेटाळता न आला
हृदयामधे तिच्या मी घर बांधल्यामुळे तर
सरकारला कधी कर आकारता न आला
इतकेच शल्य आहे फाटून चालल्याचे
धागा सुईत केव्हा मज ओवता न आला
अज्ञानता म्हणू की दोषी जिभेस मानू
शब्दार्थ स्पष्ट कुठला उच्चारता न आला
- सतीश गुलाबसिंह मालवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!