लक्षात नसल्यासारखी असतात काही माणसे/मराठीगझल/satishgmalve मुऱ्हादेवी
लक्षात नसल्यासारखी असतात काही माणसे
अज्ञात माझ्यासारखी असतात काही माणसे
गुणगान करण्यासारखी असतात काही माणसे
हमखास देवासारखी असतात काही माणसे
दिवसामधे शोधू नका, ज्वाज्वल्यता त्यांची कधी
आकाश ताऱ्यासारखी असतात काही माणसे
हरलो तरी चालेल पण माघार नाही घ्यायची
झुंझार योध्यासारखी असतात काही माणसे
शहरामधे राहूनही जपतात माणुसकी किती
शहरात गावासारखी असतात काही माणसे
चिरण्यास अंधारा तुला त्यांच्यातही असते धमक
बिलकूल सुर्यासारखी असतात काही माणसे
सर्वस्व त्यांच्यावर मला उधळून द्यावे वाटते
दिलदार मित्रासारखी असतात काही माणसे
ताणा किती त्यांना फरक पडणार नाही फारसा
बहुतेक रबरासारखी असतात काही माणसे
- सतिश मालवे,मुऱ्हादेवी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!