थापली भाकर तिने पाहून चंद्राला/मराठी गझल सतिश गुलाबसिंह मालवे/मुऱ्हादेवी
थापली भाकर तिने पाहून चंद्राला
आणले ताटामधे वाढून चंद्राला
राहुलाही कोणत्या लागू नये पत्ता
ठेवल्यावरती तिने लपवून चंद्राला
बांधली राखी कुठे चंद्रास आईने?
आठवे 'मामा' मला पाहून चंद्राला
अंबराशी घट्ट नाते जोडले गेले
तू जशी आलीस ओवाळून चंद्राला
मोगरा जळतो अता पाहून चंद्राला
घेतले आहेस का माळून चंद्राला?
काय सोने लागले मुखड्यास चंद्राच्या
(पाहतो आहेस तू निरखून चंद्राला)
बांधतो आहे तुझ्याशी गाठ जन्माची
घे भले साक्षीस या ठेऊन चंद्राला
यामुळे सारे तुला भोळा म्हणत होते
तू शिरावर घेतले लावून चंद्राला

वाह ...!सरजी👌
उत्तर द्याहटवा