“सतीश मालवे यांच्या ‘एक पक्षी’ गझलसंग्रहाची गगनभरारी; सलग चौथा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार”
सोलापूर : दिनांक १० मे २०२६ रोजी काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर तर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुऱ्हादेवी येथील मूळ रहिवासी तथा सध्या शिक्रापूर (पुणे) येथे वास्तव्यास असलेले गझलकार सतीश गुलाबसिंह मालवे यांच्या “एक पक्षी” या गझलसंग्रहाला स्व. रुक्मिणीबाई नारायण चवडेकर स्मृती सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लोकमान्य टिळक सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय, किल्ला बागेसमोर, सोलापूर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुहास पुजारी, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ई. ज. तांबोळी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मसाप पुणे राज्य प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्य सचिव कालिदास चवडेकर, कृष्णा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार यांनी भूषविले.
मराठी गझल क्षेत्रातील संवेदनशीलता, सामाजिक आशय आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती यांची दखल घेत “एक पक्षी” या गझलसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार सतीश मालवे यांनी पत्नी भाग्यश्री मालवे यांच्या समवेत स्वीकारला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दाम्पत्याचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्य प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीही सतीश मालवे लिखित “एक पक्षी” या गझलसंग्रहाला साहित्यकणा फाऊंडेशन, नाशिक तर्फे सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य तर्फे सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार, तसेच काव्यरसिक मंडळ, डोंबिवली तर्फे विशेष उल्लेखनीय गझलसंग्रह पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गझल मंथन साहित्य संस्था तर्फे प्रकाशित झालेल्या या गझलसंग्रहाला प्रकाशित होऊन अवघे एक वर्ष पूर्ण होत असतानाच सलग चार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मराठी गझल क्षेत्रात “एक पक्षी” या गझलसंग्रहाची विशेष दखल घेतली जात असून साहित्यविश्वात संग्रहाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!