गझल- करावा मी कसा प्रतिकार डोळ्यांनी

करावा मी कसा प्रतिकार डोळ्यांनी?
तिने जर काढली तलवार डोळ्यांनी

उगवणा-या पिढीला काय सांगावे?
किती या सोसला अंधार डोळ्यांनी

लपवता येत नसले दुःख जर मित्रा 
लगोलग ढाळ संततधार डोळ्यांनी 

उघड डोळे मनाचे आणि बघ तेव्हा
कसा दिसतो तुला संसार डोळ्यांनी

जखम कोरून करतो दुःख आनंदी
कधी तर लावतो अंगार डोळ्यांनी

खरे तेव्हा तुला आम्ही शरण येऊ
दिसावा फक्त साक्षात्कार डोळ्यांनी

तसा अंदाज माझा हा खरा ठरला
दिला नाही तिने होकार डोळ्यांनी

- सतिशसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!