सुप्रसिद्ध गझलकार संदीप जाधव यांच्या धूळ बसलेली नको झटकून काढू या गझलेचे गझलेचे सतिशसिंह मालवे यांनी केलेले रसग्रहण
गझल- संदीप जाधव
रसग्रहण - सतिशसिंह मालवे
धूळ बसलेली नको झटकून काढू
भूतकाळाला नको उकरून काढू
अर्थ घे समजून तू माझ्या कथेचा
फक्त पानांना नको चाळून काढू
भाग जी झालीय माझ्या काळजाचा
ती तुझी बरची नको उपसून काढू
आग बघुनी विझवणारे म्हणत होते,
'आपले वांगे चला भाजून काढू'
आज जे हातात आहे ते करू चल,
'तांदळामधले खडे वेचून काढू'
मुखवटा हट्टून म्हटला चेहऱ्याला,
"आरशाला आज चल हकलून काढू"
गुंतवत गेलो स्वतःला हेच ठरवत
"गुंतलेला जीव गुंत्यातून काढू
--संदीप जाधव
बघुयात या गझलेचा मतला
धूळ बसलेली नको झटकून काढू
भूतकाळाला नको उकरून काढू
म्हणतात ना जुने मुडदे उकरण्यात काही मजेदारी नाही.त्याने आपले काही साध्य होत नसते, आपण जेव्हा आपल्या भूतकाळात झोकून पाहत असतो तेव्हा आपल्या समोर फक्त अन फक्त आठवांची खाई दिसते आणि त्या भूतकाळाच्या खाईत अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा कचरा असतो. तो कचरा साफ करणे म्हणजे खपली धरलेल्या जखमेला सोलत बसण्यासारखे नाही का होणार?
दोन व्यक्तीत चालणारे वैचारिक मतभेद किंवा दोन व्यक्तीत चालणारा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून काही चांगली माणसे ते भांडण मिटवून दोघांनाही प्रेमाचा सल्ला देत असतात. आणि त्या उलट एखादा व्यक्ती येऊन त्याच वादाच्या गोष्टी करून रागात असणाऱ्या माणसाला उकवसवण्याचे प्रयत्न करतो.जणू काही तो क्षण गझलराने आपल्या कवी दृष्टीने टिपला आहे. बघा ना! किती सहज आणि साध्या सोप्या शब्दांत चुगलखोर लोकांना कवीने आरसा दाखविला आहे.
जबरदस्त प्रतिमांचा वापर करून मतल्यातील आशय खुलवला आहे. मनाला भुरळ घालणारा मतला आणि त्यातला आशय प्रत्येक माणसाला आपलासा झाल्यावर या मतल्यावर आणखी काय बोलावे..निव्वळ अप्रतिम मतला! याच मतल्यातून आणखी अशा अनेक प्रेरणादायी विचाराचे मंथन केल्या जाऊ शकते.
ज्या गोष्टीवर काळाने आपला पडदा टाकला आहे, त्यावर विचार न करता आणि आपला अमूल्य वेळ न घालवता आपण पुढे काय चांगले करू शकतो यावर माणसाचा फोकस असला पाहिजे.अशी प्रेरणादायी शिकवण देणारा हा मतला आपण पाहिला!
या गझलेतील आता शेरांकडे वळूयात
शेर
अर्थ घे समजून तू माझ्या कथेचा
फक्त पानांना नको चाळून काढू
जसे की आपल्याला माहितीच आहे. भावनांची अभिव्यक्ती ही मानवी जीवनाची नितांत गरज आहे आणि त्या भावना व्यक्त करण्यासाठी गझल सारखे सशक्त माध्यम दुसरे कोणते असावे? हा शेर साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या वाचकांना उद्देशून असावा की काय असे मनात आले तरी हाच शेर माणसाच्या अंतरात असलेल्या व्याकुळ भावनेचे प्रतिनिधित्व करत असल्याचे जाणवते आहे.
साहित्य असो की माणसाचे मन ते वाचायचे म्हणून वाचायचे नसते तर त्याला समजून घायचे असते, त्याचा अर्थ समजून घेतला तरच आपल्याला उपयोग झाला म्हणावा आणि तसेही कवी असो की सर्वसामान्य माणसाची व्यथा तो जेव्हा मांडत असतो तेव्हा काहीतर, त्याला आशा असते की आपण व्यक्त केले विचार कुणीतरी समजून घेतले पाहिजे. आणि असे झाले तरच त्याला त्याचे समाधान झाल्याचा आनंद होत असतो. मानवी जीवन सुद्धा एक प्रकारची कथाच आहे त्या कथेतले आपण एक पात्र आहोत. त्यामुळे माणसाला वाचण्याची कला अंगात असणे अत्यावश्यक आहे.शयाद त्याच मुळे संदीपजी आपल्या पुढील शेरात म्हणतात
भाग जी झालीय माझ्या काळजाचा
ती तुझी बरची नको उपसून काढू
या शेरातील सहज सुंदर मांडणी वाचकांना एक वेगळा जगात घेऊन जाणारी आहे विशेष करून या शेरामध्ये जो "बरची" शब्दप्रयोग केलेला आहे तो.."बरची हे एक अस्त्रच" या शेरातला बरची शब्द वाचल्यावर मेगनाथ आणि लक्ष्मणाचा रणसंग्राम डोळ्यासमोर येत असला तरी गझलकाने ही बरची प्रियेसीच्या आठवणीला उद्देशून केलेला की काय असे वाटण्यास भाग पाडते. जिच्यावर नितांत प्रेम केले ती आज प्रियकायला सोडून जातांना म्हणावी आजपासून मला तू विसरून जा..असे म्हणून तिने जो आघात प्रियकराच्या काळजावर केला आहे आता तो वार पेलताना त्यावर जणू प्रियकर म्हणतो सर्व मान्य आहे पण तुझ्या आठवणी माझ्या जीवनाचा माझ्या काळजाचा। भाग झाल्या आहेत त्या प्रेमातल्या आठवणी मी हृदयात जपून ठेवतो आज तू जो सोडून जाण्याचानिश्चय केला आहेस तर खुशाल जा आणि याच मतावर शेवटपर्यंत ठाम रहा मला यातून मला वाचवण्यासाठी परत प्रयत्न ही करू नकोस. बरची शब्दप्रयोग या शेराला किती उंचीवर घेऊन गेला आहे हे यावरून लक्षात येते.
आग बघुनी विझवणारे म्हणत होते,
'आपले वांगे चला भाजून काढू'
आ.संदीप सरांनी धूर्त माणसाची विचार सरणी कशी असते यातून स्पष्ट केल्याचे दिसून येते पूर्वीसारखी जीव लावणारी सुखदुःखाला धावून येणारी माणसे आता राहिली तरी कुठे जो तो आपल्याच नादात इथे मग्न आहे काही अपवाद वगळता कुणालाही कुणाचेही घेणेदेणे उरलेले नाही. याचे कारण एकच की आजच्या माणसाने स्वार्थी नावाचा मुकुट धारण केला आहे.तेच वास्तव संदीपजी आपल्या शेरातून व्यक्त केला आहे.असे वाटते.
मानवी जीवन म्हणजे एक प्रकारचा गुंता आहे, आबाद हो या बरबाद पण आजच्या गरजांचा गुंता सुटत नाही आणि असा विचार मनात रुजला की गझलकाराचा लेखणीतून असे शेर जन्माला येत असतात. हा शेर बघा...
गुंतवत गेलो स्वतःला हेच ठरवत
"गुंतलेला जीव गुंत्यातून काढू
किती चपलखपणे शब्दांची मांडणी करून एकाच शेरात 'गुंतवत' गुंतलेला, गुंत्यातून' असे शब्द बसवले आहे आणि या तीन शब्दात जीव नावाचा जीव ओतून सदर शेरात जीव फुंकला आहे. खरच किती कमाल !
या गझलवर व्यक्त होण्याचा मी छोटासा प्रयत्न करून पाहिला आहे , माझ्या अल्पबुद्धीने हे रसग्रहण मी केले आहे यात अनेक चुका असू शकतात मूळ कवीचा (संदीप जाधव) यांच्या मतार्थ माझ्या रसग्रहनाच्या वेगळा असू शकते, सदर गझलरचना मंजुघोषा वृत्तात असून या गझलमध्ये सात शेर आहेत त्यापैकी मी रसग्रहनाला पाच शेर घेतले आहेत. त्यामुळे चूक भूल माफ असावी
रसग्रहणकर्ता
- सतिशसिंह मालवे
मुऱ्हा देवी


व्वा! छान रसग्रहण भाऊ..👌💐
उत्तर द्याहटवा