अमृत कुठले?मला विषाची सवय लागली आहे_मराठी गझल_सतिश मालवे_मुऱ्हादेवी_गुलाबीगझल_gulabigazal_satishmalve
अमृत कुठले?मला विषाची सवय लागली आहे
म्हणून त्याची जहाल भाषा गोड वाटली आहे
का प्रेताच्या तोंडामधले सोने काढत बसतो?
अण्णाभाऊ साठेंची जर कथा वाचली आहे
एकाएकी मनात माझ्या तरंग उठला नाही
अंतरातल्या डोहात तिने उडी मारली आहे
जडीबुटीच्या शोधामध्ये हयात गेली त्याची
वैद्यराज का पदवी त्याला सहज भेटली आहे?
शिंपतोस तू पाणी माझ्या अंगावरती कुठवर
खरी आग तर धगधगणारी मनी पेटली आहे
फुलाप्रमाणे जगावयाची इच्छा झाली तेव्हा
का काट्यांनी चोहीकडुनी गस्त घातली आहे?
उभ्या राहिल्या असंख्य शंका पुढे येउनी माझ्या
या वेळेला विश्वासाने पाठ फिरवली आहे
वाह
उत्तर द्याहटवा