कुणी जाऊन सूर्याला असे म्हणणार आहे का?/मराठी गझल Satish Malve गुलाबीगझल

 कुणी जाऊन सूर्याला असे म्हणणार आहे का?/मराठी गझल Satish Malve गुलाबीगझल


Gulabigazal



कुणी जाऊन सूर्याला असे म्हणणार आहे का

तुझ्या सुद्धा बुडाखाली बघू अंधार आहे का?


किती पडलीत भगदाडे मनाच्या जीर्ण भिंतींना

गिलावा शेणमातीने कुणी करणार आहे का


खरे म्हणजे जिच्यासाठी मनाचा डोह केला मी

खडे टाकायला येणे...तिला जमणार आहे का


जरीही नाव ओढ्याला समुद्राचे दिले आपण

नदीशी गाठ पडल्यावर टिकू शकणार आहे का


व्यथेच्या दलदलीमध्ये फसत आहे कशाला मी

मला पाहून कोणाला,कमळ स्मरणार आहे का


स्वतःची चूक झालेली स्वतःहुन मान्य केल्यावर

अशाने आपला दर्जा कमी होणार आहे का


सतिशचा यामुळे असतो निरंतर जीव हातावर

इथे जन्मास आल्यावर मरण चुकणार आहे का


_ सतिश मालवे,अमरावती

हमु.शिक्रापूर,पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!