ती म्हणाली तेच घडले आमचे_सतिशमालवे_मराठीगझल
...
ती म्हणाली तेच घडले आमचे
आखलेले डाव फसले आमचे
शस्त्र होते की,नजर होती तिची
कैक योद्धे....गार पडले आमचे
भेटली असती सुखाची सावली
पण उन्हाने ध्येय खचले आमचे
लेखणी तलवार वाटू लागली
शब्द जेव्हा ढाल बनले आमचे
चार खांद्यांची गरज पडली कुठे?
'धड' कुरुक्षेत्रात सडले आमचे
चांगले केलेस तू......हे ईश्वरा
देह मातीचे.....बनवले आमचे
हिंमतीने साथ जेव्हा सोडली
प्राण मृत्यूने पळवले आमचे
राखता आहात काट्यांची निगा
यामुळे तर पुष्प सुकले आमचे
दूर व्हा आम्हा जवळ थांबू नका!
हेच तर ऐकून चुकले आमचे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!