कोण म्हणतो की शहाण्यासारखा फिरतो/मराठी गझल satishgmalve
कोण म्हणतो की शहाण्यासारखा फिरतो
जन्मभर माणूस वेड्यासारखा फिरतो
कारखाना काकाळजाचा बंद पडल्यावर
जीव हा बेरोजगारासारखा फिरतो
एक मुलगा कामधंदा शोधतो आहे
एक मुलगा काम नसल्यासारखा फिरतो
कावला आहेस तू बहुतेक जन्माला
त्यामुळे वैताग आल्यासारखा फिरतो
रात्रभर तुमच्या मशाली पेटत्या ठेवा
मी उभ्या विश्वात सूर्यासारखा फिरतो
बाप इकडे साफ करतो शासकी मोऱ्या
आणि मुलगा आमदारासारखा फिरतो
दाखला श्रीमंत असण्याचा जवळ माझ्या
मात्र मी येथे फकीरासारखा फिरतो
- सतिश गुलाबसिंह मालवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!