गझल- ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली

ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली
दाबून भूक आम्ही पोटात ठेवली

आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा
पण सावली घरावर तैनात ठेवली

त्यांची कशी करावी शुद्धी भगीरथा
जमवून घाण ज्यांनी हृदयात ठेवली

मी शोध घेत आहे,त्यांचा अजूनही
ज्यांची खरी कहाणी अज्ञात ठेवली

मी काय ऐतिहासिक माणूस वाटलो?
बनवून मूर्त माझी चौकात ठेवली

भोळ्या बळीस इथल्या फसवून वामना
घालून लाथ अमुच्या डोक्यात ठेवली

होईल काय वैद्या.... उपचार नेमका?
ताजी जखम मनाच्या जर आत ठेवली

- सतिशसिंह मालवे
मु-हा देवी

२ टिप्पण्या:

मराठी गझल ही तळागळापर्यंत पोहचावी यासाठी गुलाबीगझल कार्यरत आहे. स्वतःची प्रामाणिक राहून मराठी गझलेलची सेवा करावी आणि गझलेला पुढे नेण्याचे प्रयत्न व्हावे. ही सदिच्छा त्यामुळे इथे आपल्या सहकार्याची गरज आहे. कृपया इथे कॉमेंट करताना कुणाच्याही भावना दुखणार नाहीत याची काळजी घ्यावी. धन्यवाद!!