वाट पाहते कुणी तृप्तता होण्यासाठी_मराठी गझल_सतीश मालवे मुऱ्हा देवी_गुलाबीगझल
वाट पाहते कुणी तृप्तता होण्यासाठी
चातक पक्षी जगतो एका थेंबासाठी..
अश्रू माझे डोळ्यात तुझ्या आले नव्हते
दगडालाही पाझर फुटला माझ्यासाठी
मरते वेळी मनात इच्छा जगण्यासाठी
जीव अडकला अजून माझा कोणासाठी?
जीवनातले परम सत्य जर मृत्यू आहे
प्रत्येकाने सज्ज रहावे मरण्यासाठी
नका दाखवू त्याला भीती हिंस्र पशूंची
अर्पण केले जीवन ज्याने प्राण्यांसाठी
तिला भावला असेल माळी म्हणून बहुधा
कळी मनाची व्याकुळ झाली फुलण्यासाठी
बुद्ध पाहिजे काळजामधे सदासर्वदा
काय लागते अजून वेड्या धम्मासाठी
- सतिशसिंह मालवे
खूपच सुंदर गझल सरजी...
उत्तर द्याहटवा